ग्रंथसंग्रह, लोकसंग्रह जपणारे व्यक्तिमत्त्व
माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर इतिहास आणि पुस्तकात रमणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा मोठा ग्रंथसंग्रह सर्वांना ठाऊक आहे, तसाच त्यांचा लोकसंग्रहसुद्धा मोठा आहे. लेखनात एखादा मुद्दा तपशीलात मांडतात, त्यात त्यांचे वकिली कौशल्य दिसते. वैचारिक वाङ्मय लेखन त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या जीवन आणि साहित्याचा परिचय करून देणाऱ्या संकेतस्थळाचे शुक्रवारी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधीर रसाळ यांनी अनावरण केले. गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. निरंजन राजाध्यक्ष, 'एमकेसीएल' चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत, वरिष्ठ सरव्यवस्थापक उदय पंचपोर आणि व्यवस्थापकीय संचालक वीणा कामत यांची प्रमुख उपस्थिती होती. 'एमकेसीएल'ने यापूर्वी विनोबा भावे यांचे समग्र साहित्य संकेतस्थळावर आणले. 'अंतर्नाद', 'मागोवा' ही मासिकेसुद्धा आणली. मराठी भाषा संपणार असल्याची चर्चा आहे. तरीपण ९० टक्के लोक मराठीच बोलतील, असे कंपन्यांच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आहेत. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान मराठीत आणले नाही तर बाजारपेठ उपलब्ध होणार नाही. या लोकांना उत्तमोत्तम मराठी साहित्य देण्याचा प्रयत्न 'एमकेसीएल' करीत आहे. चपळगावकर यांचे संकेतस्थळ त्याचा एक भाग आहे,' असे सावंत म्हणाले.